उन्हाळ्यात करा भेंडीची लागवड आणि मिळवा लाखोंचा नफा! ही आहे योग्य पद्धत..

उन्हाळ्याची चाहूल लागताच शेतकरी बांधव नवीन पिकांच्या नियोजनाला लागतात. गहू आणि हरभऱ्याची काढणी झाल्यानंतर रिकाम्या रानात उन्हाळी भाजीपाला लागवडीचा विचार करत असाल, तर ‘भेंडी’ हा तुमच्यासाठी एक अत्यंत फायदेशीर आणि खात्रीशीर पर्याय ठरू शकतो. उन्हाळी हंगामात भेंडीला बाजारात कायमच मोठी मागणी असते आणि बाजारभावही चांगला मिळतो. त्यामुळे योग्य नियोजन केल्यास कमी खर्चात व कमी कालावधीत भेंडीतून भरघोस नफा मिळवता येतो. चला तर मग जाणून घेऊया उन्हाळी भेंडी लागवडीचे ए टू झेड (A to Z) तंत्रज्ञान!

जमिनीची निवड आणि पूर्वमशागत

उन्हाळी भेंडीसाठी काळी आणि भारी जमीन सर्वोत्तम मानली जाते. कारण उन्हाळ्यात ही जमीन कमी तापते आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते, ज्यामुळे पिकाची वाढ जोमाने होते. हलक्या किंवा मुरमाड जमिनीत उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासू शकते. लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरट करून रोटावेटरच्या साहाय्याने माती भुसभुशीत करून घ्यावी. ढेकळे फोडून जमीन १० ते १२ दिवस चांगली तापू द्यावी.

लागवडीच्या पद्धती

भेंडीची लागवड दोन प्रकारे करता येते – एक म्हणजे पारंपारिक ‘सरी-वरंबा’ पद्धत आणि दुसरी ‘बेड-मल्चिंग’ पद्धत. सरी-वरंबा पद्धतीत दोन ओळीत २ फूट आणि दोन रोपांत ९ इंच ते १ फुटाचे अंतर ठेवावे. मात्र, उन्हाळ्यासाठी ‘ठिबक सिंचन आणि बेड मल्चिंग’ हा सर्वात उत्तम पर्याय आहे. साडेचार ते पाच फुटांचे बेड सोडून त्यावर दोन लॅटरल टाकून मल्चिंग पेपर अंथरावा. मल्चिंग पेपर अंथरण्यापूर्वी बेसल डोस देणे आवश्यक आहे. मल्चिंगला लगेच छिद्रे (होल्स) न पाडता ३-४ दिवस पाणी द्यावे. यामुळे निर्माण होणाऱ्या वाफेमुळे जमिनीतील ९०% हानिकारक बुरशी नष्ट होते. यानंतरच छिद्रे पाडून लागवड करावी.

येथे वाचा – बळीराजासाठी खुशखबर! कांदा निर्यात सबसिडी लागू

उन्हाळी हंगामासाठी योग्य बियाणे (जाती)

उन्हाळ्याच्या कडक उन्हातही तग धरून राहतील अशा उष्णता सहनशील (Heat Tolerant) जातींची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये सिंजेंटा कंपनीची ‘OA 102’, अ‍ॅडव्हान्टाची ‘राधिका’ आणि नामधारी सीड्सची ‘NS 862’ या वाणांची तुम्ही निवड करू शकता. या जाती रोगप्रतिकारक असून उत्तम उत्पादन देतात.

येथे वाचा – 3 लाखांपर्यंतची कर्जमाफी आणि 1 लाखाचे प्रोत्साहन अनुदान खरोखरच मिळणार?

खत आणि पाणी व्यवस्थापन

लागवडीच्या वेळी प्रति एकरी ५० ते ७० किलो DAP आणि ३० ते ३५ किलो MOP (पोटॅश) देणे गरजेचे आहे. लागवडीनंतर एका महिन्याने उरलेले २०-२५ किलो पोटॅश ठिबकद्वारे द्यावे. शक्य असल्यास शेणखताचा वापर नक्की करा.
पाण्याचे नियोजन करताना बेड मल्चिंग असल्यास ३ ते ४ दिवसांनी पाणी द्यावे. सरी-वरंबा पद्धत असल्यास उघड्या जमिनीतून बाष्पीभवन जास्त होत असल्याने दिवसाआड पाणी देणे आवश्यक आहे.

कीड नियंत्रण

सुरुवातीच्या काळात पिकाच्या उत्तम वाढीसाठी १९:१९:१९ आणि अमिनो ॲसिडच्या १-२ फवारण्या घ्याव्यात. तसेच मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य वेळी कीटकनाशकांचा वापर करावा.
योग्य जमिनीची निवड, सुधारित बियाणे आणि पाण्याचे अचूक नियोजन केल्यास उन्हाळी हंगामात भेंडीचे पीक शेतकऱ्यांना नक्कीच मालामाल करू शकते.

Leave a Comment

Join WhatsApp Group